-नारायणखेड येथून दोन टिप्पर जप्त; पोलीस ठाण्यात अटकाव
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला असून आज दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मोठी कारवाई केली. नारायणखेड परिसरातून बेकायदेशीरपणे रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून दोन टिप्पर रंगेहाथ पकडले.
कारवाईदरम्यान ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर बुरुकुल, आकाश खरात, तेजस शेटे, महसूल सेवक कविता शिरसाट, शिपाई ताठे तसेच वाहनचालक संतोष भोपळे यांनी सहभाग घेतला. प्राथमिक तपासात कोणतीही वैध परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. जप्त करण्यात आलेली दोन्ही वाहने पुढील आदेशापर्यंत देऊळगाव राजा येथील पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आली आहेत. संबंधित चालकांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून महसूल विभागाने अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, अवैध रेती उपशामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शासनाच्या महसुलालाही फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांनी महसूल प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले असून या धडाकेबाज भूमिकेमुळे रेतीमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

