जमीन माफियांचे उरुळी देवाचीत ‘महार वतन’ जमिनीवर दरोडे?

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा ‘हंटर’; हलगर्जीमुळे हवेली तहसीलदार रडारवर?
– अडीच महिने अहवाल रोखल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा संताप!

पुणे/आळंदी (विशेष प्रतिनिधी) – उरुळी देवाची येथील सरकारी आणि संरक्षित ‘इनाम वर्ग ६-ब महार वतन’ जमिनीवर जमीन माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, प्रशासनाच्या नाकाखाली बेकायदेशीर बांधकामांचा डोंगर उभा केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आता आपला ‘हंटर’ उगारला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अडीच महिने केराची टोपली दाखवणाऱ्या हवेली तहसीलदारांना प्रशासनाने शेवटचा इशारा दिला असून, शिस्तभंगाची टांगती तलवार त्यांच्यावर ठेवली आहे.

सविस्तर असे, की मौजे उरुळी देवाची येथील सर्वे नं. १११, २२१ आणि २२२/६ या जमिनी ‘महार वतन’ प्रवर्गातील आहेत. कायद्यानुसार या जमिनींच्या विक्रीसाठी किंवा बांधकामासाठी शासनाची पूर्वपरवानगी अनिवार्य असते. मात्र, जमीन माफियांनी सर्व कायदे धाब्यावर बसवून येथे अनधिकृत खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बांधकामांचा सुळसुळाट केला आहे. अमोल अशोक बहुले यांनी या संदर्भात पुराव्यासह तक्रार केल्यानंतर हे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने हवेली तहसीलदारांना वारंवार दिले होते. मात्र, अडीच महिने उलटूनही तहसीलदारांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. “तहसीलदार साहेब, कुणाचे पाठबळ लाभले आहे?” असा सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जात आहे. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे अंतिम निर्देश दिले असून, कसूर केल्यास ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


नजराणा कुणाच्या खिशात?

जमिनीचा वापर बदलण्यासाठी भरायचा ५० टक्के नजराणा आणि बिनशेती सारा शासनाकडे जमा झाला आहे का? हा मोठा प्रश्न आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून काही अधिकारी आणि माफियांचे खिसे भरले जात असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. ॲड. सुरज जाधव यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाजू मांडून जिल्हाधिकाऱ्यांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. सरकारी जमीन म्हणजे बापाची पेंढ समजणाऱ्या जमीन माफियांना आता वेसण घालण्याची वेळ आली आहे. जर सरकारी अधिकारीच अशा प्रकरणांत ‘ढिम्म’ राहणार असतील, तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? जिल्हाधिकाऱ्यांनी आता नुसते इशारे न देता, थेट बुलडोझर चालवून या माफियांचे आणि त्यांना साथ देणाऱ्यांचे कंबरडे मोडावे, अशी मागणी जनतेतून पुढे आली आहे.

Share This Article
Exit mobile version