भरधाव ट्रकचा कहर; परीक्षेला निघालेल्या तरूणाला चिरडले!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– मालगणी फाटा हादरला; एकलारा गावावर शोककळा
– चिखली–बुलढाणा मार्गावरील हातणीजवळील दुर्देवी घटना

चिखली (तालुका प्रतिनिधी) – वेगाच्या बेफाम स्पर्धेत आणखी एका निष्पाप जीवाचा बळी गेला. चिखली–बुलढाणा मार्गावरील मालगणी फाटा (हातणी जवळ) येथे आज (दि.12) सकाळी सुमारे सव्वा नऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा चिरडल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. शंतनू नारायण अंभोरे (वय २१, रा. एकलारा ता. चिखली) असे मृत युवकाचे नाव असून, तो परीक्षा देण्यासाठी जात असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू अंभोरे हे आज सकाळी एकलारा येथून बुलढाणा येथे परीक्षा देण्यासाठी दुचाकीने निघाले होते. मालगणी फाटा परिसरात पोहोचताच भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेनंतर ट्रकने दुचाकीला अक्षरशः चिरडल्याने शंतनू यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर शहारे आले. अपघातानंतर काही काळ चिखली–बुलढाणा मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, माहिती मिळताच पीएसआय गाढे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर तो नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून, चिखली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एकुलत्या एक मुलाच्या निधनाने एकलारा गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वेगाच्या बेफाम धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण कधी येणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Share This Article
Exit mobile version