मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात विविध काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-हर्षवर्धन सपकाळ व राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित?

मुंबई (प्रतिनिधी) : रायपूर सर्कल, सैलानी, भडगाव व रायपूर परिसरातील काँग्रेस पक्षाशी संबंधित अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख धोरणांचा स्वीकार करत संबंधित कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रायपूर सर्कल सैलानी येथील शेख चांद मुजावर (माजी पंचायत समिती सदस्य), शेख असलम मुजावर (ग्रामपंचायत सदस्य), शेख इरफान मुजावर, शेख नई मुजावर, शेख रिजवान, शेख शहजाद मुजावर, शेख फिरोज मुजावर, शेख हुजेब मुजावर व शेख साहेब मुजावर (शेरू) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भडगाव येथील किशोर संतोषराव साखरे पाटील (माजी पंचायत समिती सदस्य), प्रकाश शांतीराम खडके (ग्रामपंचायत सदस्य) तसेच रायपूर येथील मोहम्मद एजाज मोहम्मद मंजूर, मोहम्मद साबीर मोहम्मद उस्मान (माजी सरपंच), शेख भिकन शेख बबलू, सलीम खान हसन खान, शेख कयूम शेख बुडन आणि मोहम्मद मुशरथ मोहम्मद एजाज यांनीही पक्षप्रवेश केला.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध विकासकामांमुळे भाजपच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास दिसून येत असून त्याचाच परिणाम म्हणून विविध भागांतून काँग्रेसमधील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे स्थानिक स्तरावर भाजपची ताकद वाढत असल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतःच्या बुलढाणा जिल्ह्यात पक्षांतर रोखण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाबाबत स्थानिक पातळीवर नाराजी असल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेशाचे प्रमाण वाढत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत व्यक्त केले जात आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपा नेते शंकर पाटील तरमळे, पिंपळगावसराईचे सरपंच केशव पाटील तरमळे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप पाटील उगले, माजी सरपंच गणेश पाटील साखरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील शेवाळे आणि मंगेश तरमळे यांची उपस्थिती होती.

Share This Article
Exit mobile version