खात्यात चुकून जमा झालेले १ लाख ४८ हजार रुपये रुग्णाच्या वडिलांनी परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श घडविला

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-टाटा ट्रस्टची मदत गैरसमजाने खात्यात जमा; क्षणाचाही मोह न धरता रक्कम एमजीएम रुग्णालयात जाऊन परत

बिबी (ऋषी दंदाले) : टाटा ट्रस्ट, मुंबई हे गरजू रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करत असते. मात्र लोणार तालुक्यातील खापरखेड येथील अनिल बाबुसिंग राठोड यांच्या बँक खात्यात टाटा ट्रस्टकडून चुकून १ लाख ४८ हजार रुपये जमा झाले होते. ही रक्कम आपली नसल्याचे लक्षात येताच राठोड कुटुंबीयांनी ती तात्काळ परत करून समाजासमोर प्रामाणिकपणाचा आदर्श उभा केला आहे.

अनिल राठोड यांच्या मुलावर काही काळापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार पूर्ण होऊन मुलगा बरा झाल्यानंतर ३० जानेवारी रोजी त्यांच्या खात्यात अचानक ही रक्कम जमा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही मदत आपल्यासाठी नसल्याचे समजताच अनिल राठोड यांनी त्वरित एमजीएम रुग्णालयातील संबंधित जनसेवकांना याबाबत माहिती दिली. यानंतर टाटा ट्रस्टच्या प्रतिनिधींनी सदर रक्कम परत करण्याची विनंती केली. कोणताही गैरफायदा न घेता अनिल राठोड, त्यांची पत्नी व मुलगा हे तिघेही स्वतः छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात गेले आणि चेकद्वारे १ लाख ४८ हजार रुपये टाटा ट्रस्टच्या प्रतिनिधींना सुपूर्द केले.

रक्कम स्वीकारताना टाटा ट्रस्टच्या डॉक्टर व प्रतिनिधींनी अनिल राठोड व त्यांच्या कुटुंबीयांचे विशेष अभिनंदन केले. कुण्या गरजू रुग्णासाठी असलेली मदत प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल जिल्हाभरातून अनिल राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “आज देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीप्रमाणे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, फोनद्वारे माहिती देऊन आणि स्वतः जाऊन रक्कम परत करून अनिल राठोड यांनी समाजासमोर प्रामाणिकपणाचा प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

Share This Article
Exit mobile version