-उपेक्षित व वंचित समाजासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य – माजीमंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे
-वधू–वर परिचय मेळाव्यातून नात्याची वीण घट्ट होते – माजी खासदार रामदास तडस
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : जळगाव–जामोद येथे तेली समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भव्य वधू–वर व पालक परिचय मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. या मेळाव्यामुळे समाजातील नातेसंबंध दृढ होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस म्हणाले की, आज बुलढाणा जिल्हा व नांदेड येथे एकाच वेळी वधू–वर परिचय मेळावे होत आहेत. वधूला योग्य वर व वराला योग्य वधू मिळावी, नात्याची वीण घट्ट व्हावी यासाठी असे मेळावे महत्त्वाचे आहेत. जळगाव–जामोद येथे स्वतंत्र तेली समाज भवन उभारावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित मान्यवरांनी समाजबांधवांशी संवाद साधत तेली समाजाचे संघटन, शिक्षण, युवक-युवतींचे भविष्य, सामाजिक एकोपा आणि प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज यावर विचार मांडले. अशा उपक्रमांमुळे नातेसंबंध दृढ होण्याबरोबरच समाजाची एकजूट अधिक मजबूत होत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी माजीमंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते वधू–वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामदास तडस, भाजप खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, रमेश आकोटकार, संदीप चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे, रामदास देव्हडे, नगरसेविका विमलताई देव्हडे, संजय चोपडे, गणेश अरुडकार, संजय पांडव, प्रफुल कावरे, गणेश जामोदे, तैलिक महासभेचे प्रसिद्धी प्रमुख अशोक इंगळे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव क्षिरसागर यांच्यासह समाजातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

