मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरवर पोलिसांचा बडगा!

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-सिंदखेड राजा पोलिसांची धडक कारवाई; दोन बुलेट जप्त

सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : शहरातील नागरिकांच्या शांततेला बाधा आणणाऱ्या मोठ्या आवाजाच्या बनावट सायलेन्सरविरोधात सिंदखेड राजा पोलीस ठाण्याने कडक भूमिका घेतली आहे. ठाणेदार आशिष इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दोन बुलेट दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, इतर वाहनधारकांना कडक इशाराही देण्यात आला आहे.

शहरात तसेच कॉलेज परिसरात काही तरुणांकडून कंपनीने न बसवलेले, फटाक्यासारखा मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून बुलेट वाहनांवरून फिरत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. या मोठ्या आवाजामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. या तक्रारींची गंभीर दखल घेत ठाणेदार आशिष इंगळे व वाहतूक अंमलदार गजानन बनसोडे यांनी संयुक्तपणे शहरात तपास मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान नियमबाह्य सायलेन्सर बसवलेल्या दोन बुलेट वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ती वाहने जप्त करण्यात आली.

यावेळी संबंधित वाहनधारकांना समज देत, भविष्यात अशा प्रकारचा प्रकार आढळून आल्यास मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे सिंदखेड राजा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Share This Article
Exit mobile version