दादांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी, त्यांचा ऋतबा वेगळाच – माजी आमदार डॉ. रायमुलकर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-मेहकरमध्ये सर्वपक्षीय शोकसभेत आठवणींना उजाळा; अनेकांचे हुंदके, भावना अनावर

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : “अजितदादांनी आपल्या कार्यातून राज्याचा खरा ‘दादा’ असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या वाणीतून काम करण्याची ऊर्जा मिळायची. त्यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली असून त्यांचा ऋतबा वेगळाच होता,” असे भावनिक उद्गार माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी काढले.

उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी २९ जानेवारी रोजी मेहकर येथील स्वतंत्र मैदानावर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला, तर काहींना हुंदके येत भावना अनावर झाल्या. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर म्हणाले की, दादांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. “काम कुठेच अडले, तर दादांकडे गेले की ते नक्की होईल,” असा विश्वास सर्वसामान्यांमध्ये होता, असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील आठवणी सांगितल्या. बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी दादांमुळेच बाजार समित्या जिवंत राहिल्याचे नमूद केले. नगराध्यक्ष किशोर गारोळे म्हणाले की, दादा हे विरोधकांनाही आवडणारे नेतृत्व होते. तहसीलदार निलेश मडके यांनी मेहकरातील जनतेच्या कामांसाठी दादांचे थेट फोन यायचे, अशी आठवण सांगितली.

यावेळी माजी नगराध्यक्ष कासम गवळी, मुख्याधिकारी रामराजे कापरे, बार असोसिएशनचे अ‍ॅड. अनंतराव वानखेडे, भीमशक्तीचे नेते भाई कैलास सुखधाने, अ‍ॅड. सुरेश वानखेडे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आलीम ताहेर, शिवसेना गटनेते सुरेश वाळुकर, शिवसेना शहरप्रमुख जयचंद बाठीया, भाजपाचे डॉ. सुभाष लोहीया, नगरसेविका डॉ. दिपीका राहाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नगरपालिकेचे कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिरीधर पाटील यांनी केले. संचालन पत्रकार सिद्धेश्वर पवार व युनूस पटेल यांनी केले, तर आभारप्रदर्शन राजू नवले यांनी केले.

Share This Article
Exit mobile version