-माऊली मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; इंद्रायणी घाटावर हरिनाम गजरात आरती उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील जया एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांतून एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. भाविकांनी नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात मंदिरात प्रवेश करून दर्शनाचा लाभ घेतला.
दिवसभर मंदिरात फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवचन, रात्री गुरुवारची श्रींची पालखी मंदिर प्रदक्षिणा तसेच धुपारती परंपरेनुसार पार पडली. दर्शन व प्रदक्षिणेपूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानासाठी गर्दी केली. सप्ताहातील कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने हरिनाम गजरात आरती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट, महिला मंडळ व ग्रामस्थांच्या सहभागाने आरती सेवा पार पडली. आरतीनंतर पसायदान व प्रसाद वाटप करण्यात आले.
एकादशीच्या निमित्ताने आळंदीत सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी प्रभावी नियोजन केले. बेकायदेशीर वाहन पार्किंग व बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू असल्याने भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी प्रदूषणमुक्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच राज्यातील दुर्दैवी घटनेत निधन पावलेल्या मान्यवरांना इंद्रायणी नदी घाटावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

