-जांभोरा येथील वहिवाटी शेतवाटेच्या न्यायासाठी २९ जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
साखरखेर्डा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा गावातील प्रसिद्ध ७६ वर्षीय गंभीरराव गुरुजी खरात यांनी पुरातन वहिवाटी शेतवाट खुली करण्यासाठी अखेर अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजल्यापासून ते तहसील कार्यालय, सिंदखेडराजा येथे अन्नत्याग उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
गंभीरराव गुरुजी खरात यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीतील शेतवाट खुली करण्यासाठी गेल्या जवळपास दोन वर्षांपासून तहसीलदार, सिंदखेडराजा यांच्याकडे सातत्याने अर्ज केले आहेत. मात्र, विविध कारणे देत आजपर्यंत केवळ “तारीख पे तारीख” देण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. गंभीरराव गुरुजी हे पंचक्रोशीत सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व असून, त्यांना न ओळखणारे गाव या परिसरात नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्य स्वीकारून शिक्षण क्षेत्रात घालवले आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी सेवा बजावली, त्या ठिकाणी ते पालक व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या शैक्षणिक कार्यातून असंख्य विद्यार्थी घडले असून आज ते विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन अध्यात्म क्षेत्राला समर्पित केले आहे. दरवर्षी जांभोरा गावात तसेच पंचक्रोशीत नगरभोजन व महाप्रसादाचे आयोजन करून सामाजिक व धार्मिक कार्यातही ते सक्रिय असतात. मात्र, दिनांक १२ ऑक्टोबर २०२० पासून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीतील पुरातन शेतवाट अडविण्यात आल्याने शेती करणे अत्यंत कठीण झाले आहे. रस्त्याअभावी शेतातील कामे रखडली असून संपूर्ण शेती व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. या संदर्भात त्यांनी रीतसर कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनासंदर्भात त्यांनी महसूल मंत्री, खासदार, मतदारसंघाचे आमदार, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनांच्या प्रती सादर केल्या आहेत. जीवनभर विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या, न्यायप्रिय व शिस्तप्रिय शिक्षकाला वयाच्या ७६ व्या वर्षी न्यायासाठी अन्नत्याग उपोषण करावे लागत असल्याने या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

