रेतीमाफियांवर सरकारी हातोडा!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-महसूल–पोलीसांचा अचानक छापा; दोन बोटी पकडून जागीच चिरडल्या

सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : खडकपूर्णा जलाशयात राजरोस सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर अखेर प्रशासनाचा कठोर प्रहार झाला आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या ठाम निर्देशानुसार महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करत रेतीमाफियांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या कारवाईत अवैध उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन बोटी जप्त करून जागीच नष्ट करण्यात आल्या.

दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली अवैध रेती वाहतूक व उत्खनन प्रतिबंध पथक गस्तीवर असताना, सिनगाव जहागीर येथील गट क्रमांक 341, खल्लाळगव्हाण रस्त्यालगत खडकपूर्णा जलाशयात अंधाराचा फायदा घेत फायबर व इंजिन बोटीच्या साहाय्याने रेती उपसा सुरू असल्याचे उघडकीस आले.

पथकाने क्षणाचाही विलंब न करता थेट कारवाई करत एक मोठी फायबर बोट व एक छोटी इंजिन बोट ताब्यात घेतली. त्यानंतर या बोटी किनाऱ्यावर आणून प्रशासनाच्या उपस्थितीत चिरडून नष्ट करण्यात आल्या. कारवाईचा सुगावा लागताच बोटीवर काम करणारे परप्रांतीय मजूर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र घटनास्थळी एक आधार कार्ड मिळून आल्याने रेतीमाफियांची साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर कागदपत्र पुढील तपासासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या धडक कारवाईत रेती उपसासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले. जलाशयाच्या तळाशी खोदलेले खड्डे बुजवून मोडीत काढण्यात आले, तर अवैध रेती वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले रस्तेही तोडून टाकण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

या संयुक्त कारवाईत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळाधिकारी विजय हिरवे (मेहुणा राजा), महसूल सहाय्यक उमेश गरकल, प्रशांत वाघ, ग्राम महसूल अधिकारी संजय हांडे, आकाश खरात, सरिता वाघ, तेजस शेटे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल माधव कुटे, कलीम देशमुख, शिपाई ताठे, महसूल सेवक वैशाली देशमाने व मारुती बंगाळे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. खडकपूर्णा परिसरात अवैध रेती उत्खननाला पायबंद घालण्यासाठी अशाच धडक व निर्दयी कारवाया सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिल्याने रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

Share This Article
Exit mobile version