– विमान की मृत्यूचा सापळा? विमानाचा अक्षरशः कोळसा; घातपाताचा संशय व्यक्त झाल्याने खळबळ; राज्यात शासकीय दुखवटा जाहीर!
मुंबई/बारामती (बाळू वानखेडे) : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात, प्रशासनावर पोलादी पकड असणारा लोकनेता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज (दि. २८) सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. सकाळी ९:१५ च्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. ज्या बारामतीने दादांना घडवले, त्याच मातीत त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने राज्यभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुले पार्थ आणि जय पवार असा मोठा परिवार आहे. राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून, आज सुट्टी जाहीर केली आहे.
प्रशासकीय शिस्त आणि कामाच्या झपाट्यासाठी ओळखले जाणारे अजितदादा अशा प्रकारे एक्झिट घेतील, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. मात्र, या अपघातानंतर राजकीय वर्तुळात संशयाची पाल चुकचुकली आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी या दुर्घटनेमागे ‘घातपाताचा’ संशय व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे. “ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या नेत्याच्या विमानाचा असा भीषण अपघात होतोच कसा? तांत्रिक तपासणीत त्रुटी होत्या की ही मोठी साजीश आहे?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
—–
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या अजितदादांची ओळख ‘ पहाटे मंत्रालयात हजर होणारा लोकनेता’ अशी होती. कामात हलगर्जीपणा त्यांना कधीच खपत नसे. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
——-
बारामतीसह पुणे जिल्ह्यात सध्या कडकडीत बंद आणि स्मशानशांतता आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले नियोजित कार्यक्रम आणि सभा रद्द करून या जननेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता निखारा शांत झाला आहे. या घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे!” अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.
अजितदादा पवार यांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या बारामती मेडिकल कॉलेज परिसरात तुफान गर्दी. ‘अजित दादा परत या,’ अशा भावना व्यक्त करत महिलांनी आक्रोश व्यक्त केला. तर, ज्येष्ठ नागरिक अजित दादांच्या दर्शनासाठी ठाण मांडून बसले. लहानग्यांच्या आसवांनी परिसरात शोककळा पसरली. ‘एकच वाद, अजित दादा,’ ‘अजितदादा अमर रहे,’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असून राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजित पवार यांच्या निधनामुळे एक दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.

