राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सिंदखेडराजात लोकशाहीचा जागर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-तरुणाईच्या सहभागातून सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तसेच नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सिंदखेडराजा तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. मतदान हे केवळ औपचारिक कर्तव्य नसून, तो प्रत्येक भारतीय नागरिकाचा घटनात्मक व राष्ट्रीय हक्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी तहसीलदार अजित दिवटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकशाही अधिक सक्षम ठेवण्यासाठी तरुण पिढीने कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा गैरप्रलोभनाला बळी न पडता निर्भय, पारदर्शक व सजगपणे मतदान करावे. नवमतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून नवमतदारांचे स्वागत व सत्कार, लोकशाही मूल्ये व मतदानाचे महत्त्व यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना सामूहिक मतदार प्रतिज्ञा देण्यात आली. या प्रतिज्ञेमुळे नागरिकांमध्ये आपल्या कर्तव्यांबाबत अधिक जाणीव निर्माण झाली.

या कार्यक्रमास तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार बंगाळे, महसूल सहाय्यक नागेश खरात, पत्रकार मुकूंद पाठक, सर्व बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रतिनिधी, तसेच जिजामाता, महात्मा फुले व आदर्श शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विशेषतः नवमतदारांमध्ये लोकशाहीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अधिक सजग, जबाबदार व जागरूक मतदार घडविण्यास हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले.

Share This Article
Exit mobile version