मेदनकरवाडीत रथ सप्तमी परंपरेने उत्साहात साजरी; श्री खंडोबा महाराजांच्या मानाच्या गाड्याचे भव्य पूजन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-लोकपरंपरा, नवसपूर्ती आणि अन्नदानातून जपली जात आहे ग्रामदैवताची श्रद्धा

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी परिसरातील मेदनकरवाडी येथे श्री खंडोबा देवस्थान श्रींच्या मंदिरात रथ सप्तमी हा पवित्र सण प्रथा–परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. रथसप्तमीच्या दिवशी श्री खंडोबा महाराज यांचा पुष्पसजावटीने सजलेला वैभवी मानाचा गाडा विधीवत पूजन करून भंडारा उधळण्यात आला. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

भाविकांनी रांगा लावून श्रींचे तसेच मानाच्या गाड्याचे दर्शन घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत श्री खंडोबा महाराजांची पूजा, आरती तसेच देवाची पदे व भजने गायन करण्यात आली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. मेदनकरवाडी येथील श्री खंडोबा महाराजांचे सेवेकरी म्हणून चऱ्होली, कुरूळी आणि चाकण परिसरातून मानकरी परंपरेने येतात. येथील श्रीक्षेत्र हे राज्यभर नवसपूर्तीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून “नवसाचा देव पावतो” अशी भाविकांमध्ये दृढ श्रद्धा आहे. श्री खंडोबा महाराज मंदिराचे सेवेकरी अरुण तोडकर तसेच गावातील लहान-थोर मंडळी रथ सप्तमीपासून माघ पौर्णिमेपर्यंत परंपरेने देवाची पूजा करतात. रथसप्तमीच्या दिवशी पूजा व आरतीनंतर भाविकांसाठी अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रथ सप्तमी ते माघ पौर्णिमा या नऊ दिवसांच्या कालावधीत मानाच्या गाड्यांना भाविकांकडून पाणी घालण्याची जुनी परंपरा आजही काटेकोरपणे पाळली जाते. रथसप्तमी निमित्ताने श्री खंडोबा मंदिरासमोर बैलगाडा पूजनही करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेत प्रथा-परंपरांचे पालन केले. महाप्रसादाचे वाटपही उत्साहात पार पडले. या भक्तिमय सोहळ्यामुळे मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थानाची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Share This Article
Exit mobile version