‘लोणार’चे पाणी हायकोर्टाच्या पायऱ्यांपर्यंत गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांची हालचाल; सरोवराची प्रत्यक्ष पाहणी

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-नैसर्गिक झरे, पर्यावरणीय समतोल आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर

लोणार (वाजिद खान) : जागतिक कीर्तीच्या खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील वाढती पाणी पातळी ही गंभीर बाब ठरत असतानाही शासनस्तरावरून दीर्घकाळ दुर्लक्ष होत होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतः पुढाकार घेत याचिका दाखल करून घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी २४ जानेवारी रोजी लोणार सरोवराची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. पाटील स्वतः सरोवरात उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. धारतीर्थ व रामगया या दोन नैसर्गिक झऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर गोड पाण्याचा सतत प्रवाह सरोवरात येत असल्याचे आढळून आले. यामुळेच सरोवरातील पाणी पातळी वाढत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या झऱ्यांचे पाणी लिफ्टिंग करून बाहेर काढण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या. याशिवाय इतर पर्यायी उपाययोजनांवरही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे सीतान्हानी, पापहरेश्वर यांसारखे इतर नैसर्गिक झरेही सक्रिय झाल्याने जलपातळी वाढली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष पती तथा स्वीकृत नगरसेवक भूषण मापारी, वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक चेतन राठोड, मेहकरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, नगर परिषद अभियंता अजय मापारी, अभियंता शुभम कुलकर्णी, मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप, तलाठी सचिन शेवाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरोवरातील पाणी पातळी वाढल्याने महादेवाची हेमाडपंथी प्राचीन मंदिरे पूर्णतः पाण्याखाली गेली असून कमळजा मातेच्या मुखवट्यापर्यंत पाणी आले आहे. पाणी पातळी वाढीमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी तातडीने संशोधन आणि उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून सातत्याने केली जात होती. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले.

पाहणीदरम्यान सरोवरातील पाण्याची पीएच पातळी तपासण्यात आली. पोटॅशियम हायड्रोजन पेपरच्या साहाय्याने केलेल्या तपासणीत पीएच लेव्हल ११ च्या वर असल्याचे निष्पन्न झाले. याचा अर्थ या पाण्यात कोणतेही जलचर जीव जगू शकत नाहीत, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. सरोवरात मासे आढळल्याच्या चर्चांचेही त्यांनी खंडन केले. तसेच सर्व झऱ्यांतून प्रति सेकंद किती पाणी येते, याचे मोजमापही करण्यात आले. दरम्यान, मुंबई येथील आयआयटीमधील शास्त्रज्ञांमार्फत सखोल संशोधन करण्यात येणार असून, त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. धारतीर्थ व रामगया या झऱ्यांचे गोड पाणी पंपाद्वारे नगरपालिकेच्या फिल्टरपर्यंत नेल्यास ते पिण्यासाठी वापरता येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. मात्र सरोवर व परिसर वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पाणी लिफ्टिंगसाठी वनविभागाची ना-हरकत आवश्यक असून, परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.

Share This Article
Exit mobile version