सहदेव लाड यांच्या आंदोलनाच्या धसक्याने पंचायत समितीची दखल; खंडाळा–चोरपांग्रा शेत रस्त्याचे काम १ फेब्रुवारीपासून सुरू होणार

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-ग्रामीण शेतरस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाला दिलासा देणारी तात्पुरती तोडगा प्रक्रिया

बिबी (ऋषी दंदाले) : खंडाळा शिवरस्ता ते चोरपांग्रा तलावाकडे जाणाऱ्या अपूर्ण शेत रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व शेतकरी नेते सहदेव लाड यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. २५ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांसह चोरपांग्रा तलावात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

या आंदोलनाच्या धसक्याची दखल घेत पंचायत समिती बांधकाम विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. यानुसार येत्या १ फेब्रुवारीपर्यंत खंडाळा ते चोरपांग्रा शेत रस्त्याचे अपूर्ण काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पंचायत समिती विभागाकडून शेतकरी नेते सहदेव लाड यांना देण्यात आले आहे. या लेखी आश्वासनानंतर उद्या होणारे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, हा रस्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून शेतीमाल वाहतूक, पाणीपुरवठा आणि दैनंदिन दळणवळणासाठी तो आवश्यक आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काम अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पंचायत समितीने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न झाल्यास यापेक्षा अधिक उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सहदेव लाड यांनी यावेळी दिला. प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version