जागदरी येथील श्री शंकरगडावर भक्तिमय वातावरणात भव्य सप्ताह व जन्मोत्सव सोहळा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-दिंडी, किर्तन व महाप्रसादासाठी भाविकांची मोठी तयारी

दुसरबीड (भगवान नागरे) : तालुक्यातील जागदरी येथील श्री क्षेत्र शंकरगड येथे श्री संत सद्‌गुरू शंकरबाबा यांच्या १११ व्या जन्मोत्सवानिमित्त दि. २५ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान भव्य दिव्य सप्ताह, किर्तनमहोत्सव व यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील संत, महंत, किर्तनकार, वारकरी संप्रदायातील टाळकरी तसेच सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाची सुरुवात रविवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत शोभायात्रेने होणार असून सकाळी ७ वाजता विविध दिंडींचे श्री क्षेत्र शंकरगड येथे आगमन होईल. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ८ विष्णुसहस्रनाम व गीता पठण, दुपारी ११ ते १ हरिकिर्तन, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री हरिकिर्तन व जागर असे नियमित धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या किर्तनमहोत्सवात ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर (जळगाव) तसेच विनोदाचार्य ह.भ.प. शिवाजी महाराज बावस्कर (नांदण) यांच्या प्रभावी किर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. समारोप दिनी दि. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत पुजनीय ह.भ.प. श्री १००८ हरीचैतन्यजी स्वामी (पळसखेड सपकाळ) यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर दुपारी १ ते ५ या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. महाप्रसादासाठी विविध अन्नदात्यांनी सहकार्य केले असून महिला व पुरुष सेवाधारी मंडळांच्या माध्यमातून पंगत व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी पाणी टँकर, आर.ओ. पाणी, मंडप व साउंड सिस्टीमची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. श्री शंकररेश्वर संस्थान व उत्सव समितीचे अध्यक्ष शंकरराव ऊगलमुगले, संस्थानचे अध्यक्ष भानुदास जायभाये तसेच ह.भ.प. सतीश डोईफोडे यांच्या वतीने भाविकांनी चारही दिवस या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हा यात्रा महोत्सव भक्ती, सेवा व सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरणार असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

Share This Article
Exit mobile version