-हरिपाठ, हरिनाम गजर व रामरक्षा ग्रंथ वाटपातून धार्मिक वातावरण निर्माण
आळंदी (अर्जुन मेदनकर): येथील श्री आवेकर-भावे श्री रामचंद्र संस्थान, आळंदी (श्री राम मंदिर) यांच्या वतीने अयोध्या श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन गुरुवारी (दि. २२) उत्साहात साजरा करण्यात आला. इंद्रायणी नदीकाठावरील श्री राम मंदिरात धार्मिक परंपरांचे पालन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी वारकरी साधकांनी हरिनाम गजरात हरिपाठ सादर केला. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. मोहन महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील साधकांनी सेवा रुजू केली. कार्यक्रमाचे संयोजन आवेकर-भावे श्री रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी केले, तर हरिपाठ सेवेचे नियोजन ह. भ. प. रामचंद्र महाराज सारंग व ह. भ. प. रवींद्र भूमकर यांनी केले. कार्यक्रमास श्रींचे पुजारी महेश अयाचित, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गोविंद ठाकूर तौर, आळंदी धाम सेवा संस्थेचे रोहिदास कदम, लक्ष्मण मेदनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीरामलल्ला मूर्तीची भव्य व मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचे लोकार्पण झाले. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ वर्धापन दिनानिमित्त भाविकांसाठी रामरक्षास्तोत्र या ग्रंथाचे वाटप तसेच प्रसाद म्हणून लाडूंचे वितरण करण्यात आले. या यशस्वी आयोजनामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व वारकरी परंपरेचे दर्शन घडले. भविष्यातही अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांतून भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा देण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.