-प्रलंबित अनुदानाचा प्रश्न विनायक सरनाईक यांनी आणला चव्हाट्यावर; गावपातळीवर याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना
चिखली (तालुका प्रतिनिधी) : शासनाने रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना खते व बियाण्यासाठी हेक्टरी १० हजार रुपये (कमाल ३ हेक्टर मर्यादेत) अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र आजही चिखली तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी प्रलंबित अनुदानाचा मुद्दा चव्हाट्यावर आणला होता.
तसेच नुकसान यादीतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा समावेश नुकसान भरपाईत करण्यात यावा, अनुदान प्राप्त व वंचित शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशा सूचना तहसीलदारांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत. चिखली तालुक्यात आजही अनेक शेतकऱ्यांना व्ही.के. नंबर प्राप्त झालेले नाहीत. काही शेतकऱ्यांना तीन हेक्टर जमीन असूनही केवळ दोन हेक्टरचेच अनुदान मिळाल्याच्या तक्रारी आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, असे शासनाने सांगितले होते; मात्र महिने उलटूनही अनुदान न मिळाल्याने “शेतकऱ्यांना अनुदान मिळणार की नाही?” असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला आहे.
शासन निर्णयानुसार कृषी विभागाने रब्बी पिकाच्या याद्या तयार करणे अपेक्षित असताना, खरीप हंगामाच्या याद्यांच्या आधारे अनुदान वर्ग करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे नेमके अनुदान कुणाला मिळाले, याचा ताळमेळ लागत नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या प्रकरणामुळे रब्बी अनुदानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही विनायक सरनाईक यांनी दिला आहे.

