-‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रमातून संस्कारक्षम पिढी घडवण्याचा प्रयत्न
आळंदी (अर्जुन मेदनकर) : ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या शालेय मुलांना संस्कारक्षम घडविण्याच्या उपक्रमांतर्गत आळंदीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २४ व २५ जानेवारी रोजी आळंदी येथे होणार असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली.
शालेय जीवनात मूल्यशिक्षणाचे महत्व अधोरेखित करत संत साहित्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा, या उद्देशाने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ व ‘ओळख श्री हरिपाठ’ हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या राज्यातील सुमारे १५० हून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम सुरू असून दीडशेहून अधिक शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहात तसेच विविध वर्गखोल्यांमध्ये पार पडणार आहे. २४ जानेवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून २५ जानेवारी रोजी अंतिम फेरी व त्यानंतर भव्य पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
स्पर्धेसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’चे विवेचन तसेच ‘ओळख श्री हरिपाठ उपक्रमाने मला काय दिले’ या विषयांवर दोन गटांत वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे, संत साहित्य आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. संत साहित्यातून सुसंस्कारित शिक्षण, सुशिक्षित नवसमाज निर्मिती आणि भावी पिढी घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमास पालक, शिक्षक, नागरिक व जाणकारांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक शाळांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला आहे.
या स्पर्धेचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारातील सर्व घटक संस्थांचे पदाधिकारी उद्घाटन, प्रत्यक्ष स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार असून स्पर्धक विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणार आहेत. पारितोषिक वितरणानंतर पसायदान व स्नेहभोजनाने या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची सांगता होणार आहे. या उपक्रमाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी पत्रकार संघ, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व अध्यापक साधक यांच्या संयुक्त माध्यमातून करण्यात आले आहे. नागरिक, पालक, विद्यार्थी व साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचे कौतुक करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

