-घरगुती वादाचे रक्तरंजित पर्यवसान, गावात खळबळ
चिखली (महेंद्र हिवाळे): घरगुती वादातून पुतण्याचा कुऱ्हाडीने खून करून फरार झालेल्या काकाला चिखली पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अवघ्या काही तासांत शिताफीने अटक केली आहे. ही घटना हातणी गावात घडली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपीला लवकर जेरबंद करण्यात यश आले.
दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी रामचंद्र मारोती जाधव (रा. हातणी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. त्यानुसार दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी घरी जेवण करत असताना त्यांचा मुलगा विनोद जाधव हा घरी आला व पत्नी सौ. मीरा हिच्यासोबत घरगुती कारणावरून भांडण करू लागला. या वेळी फिर्यादीला देखील शिवीगाळ करण्यात आली. फिर्यादी भांडण सोडविण्यास गेले असता सुनेने हस्तक्षेप करू नका असे सांगितले. हा वाद ऐकून फिर्यादीचा नातू गोपाल अजाबराव जाधव हा घरात आला. त्याने विनोद व मीरा यांना नेहमीच्या भांडणामुळे समाजात बदनामी होत असल्याचे सांगून समज दिली. याच रागातून विनोद जाधव याने कुऱ्हाडीने गोपाल जाधव याच्यावर हल्ला करून त्याचा जागीच खून केला.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०/२६ अंतर्गत कलम १०३(१), ३५२ भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भागवतकर यांच्याकडे देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डी.बी. पथकाला आरोपी शोधण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृतक गोपाल जाधव रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. दरम्यान आरोपी विनोद उर्फ मंत्री जाधव हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर चिखली डी.बी. पथकाने रात्रीच्या वेळी हातणी शिवारासह परिसरातील शेतांमध्ये शोधमोहीम राबवली. अखेर आरोपी विनोद जाधव हा मंकयाच्या शेतात लपून बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथक व चिखली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.

