-ग्रामीण भागात मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दुसरबीड (भगवान नागरे): तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक मुतारीकडे तसेच खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनकडे जाणाऱ्या २० फूट रुंद रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सदर अतिक्रमण तात्काळ हटवावे, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख हानिफ बागवान यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात तक्रारदार शेख हानिफ बागवान यांनी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात माहिती दिली आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढत असून सार्वजनिक रस्त्यांचा वापर अडथळाग्रस्त होत आहे. सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.

