देऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घरफोडी!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखाचा ऐवज लंपास, ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण!
-आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळणार – ठाणेदार आजिनाथ मोरे

मेहकर (तालुका प्रतिनिधी): खिडकीतून घरात प्रवेश करत लोखंडी पेटीचा कोंडा वाकवून सोने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे १९ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी २० जानेवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. चोरीतील आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळण्यात येतील, असे ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी सांगितले.

तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील सुरेश रामचंद्र नवत्रे (वय ५५) यांच्या घरात १९ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यान अज्ञात आरोपीने घराची खिडकी उघडून प्रवेश केला. यानंतर लोखंडी पेटीचा कोंडा वाकवून सोन्याची अंगठी (वजन ३ ग्रॅम ९७० मिली, किंमत १०,१६० रुपये), सोन्याची एकदाणी (४० मणी, वजन २० ग्रॅम १९० मिली, किंमत ४३,१६० रुपये), चांदीचे कडे (वजन २०० ग्रॅम ४६० मिली, किंमत १०,८३० रुपये) तसेच नगदी १० हजार रुपये, असा एकूण ७४,१५० रुपयांचा ऐवज लंपास केला. सदर चोरीतील मुद्देमालाची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत अंदाजे ४ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

या प्रकरणी सुरेश रामचंद्र नवत्रे यांच्या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ११/२०२६, कलम ३०५ (अ) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोका लक्ष्मण पिटकर करीत आहेत. दरम्यान, चोरीची घटना घडल्याच्या काही तासांतच बुलढाणा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सोनोने, ईरफानभाई यांच्यासह कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच ठसे तज्ञही तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, चोरीचा कसून तपास सुरू आहे. आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, तपासकामासाठी नापोका लक्ष्मण पिटकर व पोका विष्णू जगताप हे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते.

Share This Article
Exit mobile version