लोणार नगरपालिकेची स्थायी समिती गठीत

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-नगरपालिकेच्या प्रशासनाला नवी दिशा

लोणार (वाजिद खान) : लोणार नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी स्थायी समिती आज दिनांक 20 जानेवारी रोजी लोणार नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या गठीत करण्यात आली. या समितीच्या स्थापनेकडे शहरवासीयांचे विशेष लक्ष लागून राहिले होते.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष सौ. मीरा भूषण मापारी यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्ष तसेच शिक्षण सभापती म्हणून अबेद खान मोमीन खान यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बांधकाम सभापतीपदी अनिकेत राजेश मापारी, पाणीपुरवठा सभापतीपदी सौ. वंदना अरुण जावळे, आरोग्य सभापतीपदी शे. उबेद अ. मुनाफ, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. वर्षा संतोष मापारी यांची निवड करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण उपसभापती पद मात्र रिक्त ठेवण्यात आले आहे.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी, गटनेत्या सीमा नितीन शिंदे, जमिल कुरेशी, जावेद कुरेशी, गुलाब सरदार, सै. पायल शुभम भगत यांच्यासह नगरपरिषदेचे इतर सदस्य उपस्थित होते. तसेच शहराध्यक्ष कॉ. शेख समद, नितीन शिंदे, संतोष मापारी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. स्थायी समितीच्या गठनामुळे लोणार नगरपालिकेच्या प्रशासनाला नवी दिशा मिळेल, तसेच शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version