WEF 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना; ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चा जागतिक गजर

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

गुंतवणूक, रोजगार आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची भक्कम पावले

आळंदी (अर्जुन मेदनकर) : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक बळकट करण्याचा शासनाचा निर्धार असून, महाराष्ट्राच्या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जागतिक स्तरावर मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी WEF 2026 महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षी महाराष्ट्राने सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले होते. यंदा यापेक्षा अधिक थेट परकीय गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने निश्चित केले आहे. दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असून, महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती तसेच एकूण आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.


 

Share This Article
Exit mobile version