-आयोजक सामाजिक कार्यकर्ते मोहन धोटे, संचालक संतोषराव तोंडे तसेच सरस्वती परिवाराचे भरभरून कौतुक करण्यात आले.
(हिवरा आश्रम) मेहकर (अरूणा म्हस्के) : आई–वडील आपल्या लेकरांसाठी रक्ताचे पाणी करतात. मुला–मुलींच्या आयुष्यात आई–बाप हेच खरे देव असतात. आई नऊ महिने प्रसववेदना सहन करून आपल्याला जन्म देते. आपल्यामुळे जर त्यांना मान खाली घालावी लागली, तर असे जगणे व्यर्थ आहे. आई–वडिलांना समजून घ्या, त्यांना प्रेमाने मिठी मारा, असे भावनिक आवाहन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते डॉ. वसंत हंकारे यांनी केले.
ते जानेफळ (ता. मेहकर) येथील श्री सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात स्व. विश्वनाथ तोंडे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात बोलत होते. हा कार्यक्रम अंबिका महिला अर्बनचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मोहन जीवनराव धोटे, संचालक संतोषराव तोंडे आणि सरस्वती परिवार, जानेफळ (दे. साकरशा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. विजयाताई शरदअप्पा मिटकरी होत्या. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वसंत हंकारे, तर प्रमुख अतिथी म्हणून सत्यजित परिवाराचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, माजी उपशिक्षण अधिकारी परमेश्वर क्षीरसागर (बुलढाणा), रुपालीताई वडणकर (सरपंच, जानेफळ), गजाननतात्या कृपाळ (माजी सरपंच), डॉ. धनराज राठी (अध्यक्ष, अष्टविनायक परिवार), माधवराव आरसोडे (जिजामाता परिवार, हिवरा खुर्द), कैलासभाऊ पैठणकर, गणेशराव करवंदे, चंदूकाका गट्टाणी, रामजी सपकाळ, राजुभाऊ रहाटे, संतोषराव डोमळे व दिनूभाऊ मिटकरी आदी मान्यवर उपस्थित होते. लेझीम पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्यामभाऊ गट्टाणी यांनी करून स्व. तोंडे गुरुजी यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. त्यानंतर श्यामभाऊ उमाळकर यांनी आपल्या अनुभवकथनातून उपस्थितांची मने जिंकली. प्रा. डॉ. म्हस्के यांनी वक्त्यांना स्वलिखित पुस्तके भेट दिली.
मुख्य वक्ते प्रा. डॉ. वसंत हंकारे यांनी सुरुवातीला हलक्या–फुलक्या विनोदांतून श्रोत्यांशी संवाद साधला. मात्र आई–वडिलांच्या त्यागावर बोलताना त्यांच्या शब्दांनी सभागृह भारावून गेले. “आपल्याला सर्व ब्रँडेड सुविधा देणारा बाप स्वतः फाटकी बनियन घालतो. तो कुणासमोर रडत नाही, कारण त्याला सगळ्यांचा भार सांभाळायचा असतो,” असे सांगताना अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आई–वडिलांचा अपमान करून त्यांना पोलीस ठाण्यात उभे करणे ही आजची भयावह वास्तविकता असल्याचे सांगत, “जोपर्यंत बाप घरात आहे, तोपर्यंत त्याला जीव लावा. एकदा आई–वडील निघून गेले की जगात कोणीच कुणाचं राहत नाही,” असे ते म्हणाले. यावेळी अनेक मुलींनी हंबरडा फोडत आपल्या वडिलांना मिठी मारली. संपूर्ण सभागृह भावनिक वातावरणाने भारावून गेले.
असा अभूतपूर्व कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रा. हंकारे यांनी मोहन धोटे पाटील, डॉ. कृष्णा हावरे, संतोषराव तोंडे, संचालक मंडळ व सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे कोषाध्यक्ष श्यामभाऊ मुंदडा यांनी केले. पालक व विद्यार्थ्यांसाठी सरस्वती शिक्षण समितीच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती परिवार, जानेफळ (दे. साकरशा) येथील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या भावस्पर्शी कार्यक्रमाच्या व्हिडिओ क्लिप्स सर्वत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होत्या.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीकडून पल्स ऑक्सिमीटरचे वाटप
जानेफळ, देऊळगाव साकरशा व हिवरा खुर्द येथील दहा शाळांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने पल्स ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. हे वाटप सुप्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत हंकारे व अमर राऊत (जिल्हा कार्यकारिणी सदस्य, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, बुलढाणा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहनभैया धोटे, संतोषराव तोंडे, प्रा. कृष्णा हावरे, सुरेश काठोळे, मंटू राजुरकर, विशाल फितवे, सतीश मुरडकर, उमेश सदावर्ते यांच्यासह संबंधित शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.