युनिफाईट स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बिबीचे यश; आशिष जाधव व स्नेहल नागरे राज्यस्तरावर निवड

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-शिस्त, शक्ती आणि कौशल्याचा संगम ठरले युनिफाईट सामने

बिबी (ऋषी दंदाले) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा व जिल्हा युनिफाईट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय शालेय युनिफाईट स्पर्धा २०२५–२६ दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी शेगाव येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत लोणार तालुक्यातील सहकार विद्या मंदिर, बिबी येथील विद्यार्थी आशिष जाधव व स्नेहल नागरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली असून, त्यांची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सरस्वती विद्यालय, गोलखेड रोड येथे आयोजित या विभागीय स्पर्धांमध्ये विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बिबीचे विद्यार्थी आशिष जाधव व स्नेहल नागरे यांनी आपल्या ताकद, तंत्र आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनी प्रथम जिल्हास्तरावर अव्वल स्थान मिळवून विभागस्तरावर मजल मारली आणि आता राज्यस्तरावर पोहोचत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. ग्रामीण भागातून येऊन अशा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणे हे निश्चितच कौतुकास्पद यश मानले जात आहे.

सहकार विद्या मंदिर, बिबी ही संस्था केवळ इंग्रजी शिक्षणापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालकवर्ग तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share This Article
Exit mobile version