केरळमधील ‘राष्ट्रीय साहित्य संमेलन’च्या अध्यक्षपदी अ‍ॅड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांची निवड!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-मुन्नार येथे २६ जानेवारीला बहुभाषिक साहित्यिकांचा मेळा

छत्रपती संभाजीनगर / सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या *‘एकदिवसीय बहुभाषिक राष्ट्रीय साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा–२०२६’*च्या अध्यक्षपदी चिखली येथील ज्येष्ठ साहित्यिक, बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष तसेच प्रख्यात विचारवंत अ‍ॅड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अ‍ॅड. डॉ. विजयकुमार कस्तुरे हे केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असून सामाजिक, साहित्यिक व मानवाधिकार क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त गोवा व भंडारा येथील अधिवेशनांसह पंढरपूर येथील कवी संमेलन त्यांनी नुकतेच गाजविले आहे. तसेच गुजरातच्या सूरत येथे आयोजित कविसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणूनही त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. हे भव्य साहित्य संमेलन येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी केरळ राज्यातील निसर्गरम्य मुन्नार येथील ‘स्पाईस जंगल रिसॉर्ट’ येथे संपन्न होणार आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या या सोहळ्यात देशातील विविध भाषांतील नामवंत साहित्यिक सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी डॉ. डी. व्ही. खरात (बुलढाणा), माजी सहाय्यक आर.टी.ओ. गुणवंत गवई तसेच ज्येष्ठ कथाकार डॉ. बबन महामुने यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. संपूर्ण संमेलनाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. अ‍ॅड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या साहित्यिक अनुभवासह सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल चिखली, बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रहित व सामाजिक समतेच्या जाणिवेतून केरळच्या भूमीत मराठीसह विविध भाषांच्या साहित्याचा गौरव करणारे हे संमेलन विशेष ठरणार आहे.

Share This Article
Exit mobile version