२३ महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीसमोर ठिय्या!

सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व अर्धवेळ स्त्री परिचारिका यांचा तब्बल २३ महिन्यांचा कोरोना भत्ता अद्याप न मिळाल्याने संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. सीटू संघटनांच्या वतीने शुक्रवार (दि. १६ जानेवारी) रोजी हे आंदोलन करण्यात आले.

शासन आदेशानुसार ग्रामपंचायत स्तरावर कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भत्ता देणे बंधनकारक असतानाही प्रशासकीय व तांत्रिक कारणे पुढे करून देयके रोखली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. १३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन पत्रात कोरोना भत्त्याबाबत स्पष्ट निर्देश असतानाही, त्यामध्ये आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचा थेट उल्लेख नाही, असे कारण पुढे करून भत्ता थांबवण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. निदर्शनादरम्यान आंदोलकांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिंदखेड राजा यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी तसेच अर्धवेळ स्त्री परिचारिकांचा २३ महिन्यांचा थकीत कोरोना भत्ता तात्काळ अदा करावा, ही प्रमुख मागणी करण्यात आली. यासह अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकू नये, आशा वर्करवर ऑनलाईन कामाची सक्ती थांबवावी, ‘आरोग्य वर्धिनी’ योजनेचा मोबदला सर्व कर्मचाऱ्यांना द्यावा तसेच अर्धवेळ स्त्री परिचारिकांना गणवेश उपलब्ध करून द्यावा, अशा इतर मागण्यांचाही निवेदनात समावेश होता.

“कोरोनाच्या काळात जनजागृती, आरोग्य सर्वेक्षण, स्थलांतरितांची नोंदणी अशी जीवावर बेतणारी कामे आम्ही केली. जागतिक पातळीवर आमच्या कामाची दखल घेतली गेली; मात्र स्थानिक पातळीवर आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, तालुका अध्यक्ष (अंगणवाडी) वर्षा शिंगणे, तालुका अध्यक्ष (आशा) सुमती लिहणार व तालुका अध्यक्ष (अर्धवेळ स्त्री परिचारिका) सुशीला मगरे यांनी केले. मोठ्या संख्येने महिला कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Share This Article
Exit mobile version