वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळणे शक्य – ठाणेदार संजय मातोंडकर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत किनगाव राजा पोलिसांचा शाळांमध्ये जनजागृती उपक्रम

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने शुक्रवार (दि. १७ जानेवारी २०२६) रोजी किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील विविध शाळांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतमोजणी आज रात्री उशिरापर्यंत पार पडली 

हा उपक्रम नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीड, कामाक्षा विद्यालय, किनगाव राजा तसेच नूतन माध्यमिक विद्यालय, किनगाव राजा येथे राबविण्यात आला. यावेळी किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर व मार्गदर्शक माहिती दिली. मार्गदर्शन करताना ठाणेदार मातोंडकर यांनी रस्ता अपघातांची प्रमुख कारणे, वाहतूक नियमांचे महत्त्व, दुचाकी चालविताना हेल्मेटचा अनिवार्य वापर, चारचाकी वाहनात सीटबेल्ट लावण्याचे फायदे, वेगमर्यादेचे पालन, वाहन चालविताना मोबाईल वापरल्याने होणारे धोके तसेच झेब्रा क्रॉसिंग व वाहतूक सिग्नलचे पालन याबाबत उदाहरणांसह सखोल माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचा संकल्प केला. तसेच स्वतःबरोबरच पालकांनाही वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमास पोहेका सतीश सवडे, पोलीस कॉन्स्टेबल मदन मुळे, मदन मान्टे, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढली असून रस्ता सुरक्षा अभियान प्रभावी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Share This Article
Exit mobile version