-मलकापूर पांग्रात गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न भीषण
दुसरबीड (भगवान नागरे) : तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे ‘काळ्यापाण्याचा तलाव’ म्हणून ओळख असलेल्या सिंचन तलावातून मोठ्या प्रमाणावर अवैध पाणी उपसा सुरू असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या तलावात सुमारे ५० पेक्षा अधिक मोटारपंप टाकून रात्रंदिवस पाणी उपसा केला जात असून त्यामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. याचा थेट परिणाम येत्या काळात गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्यावर होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उन्हाळा सुरू होण्यास अद्याप काही दिवस शिल्लक असतानाच या सिंचन तलावातील अर्ध्याहून अधिक पाणीसाठा उपसण्यात आला आहे. पुढील आठ दिवस अशीच परिस्थिती कायम राहिल्यास तलाव पूर्णपणे कोरडा पडण्याची शक्यता असून त्यामुळे परिसरातील पाणीटंचाई आणखी तीव्र होणार आहे. हा तलाव परिसरातील गुराढोरांसाठी तसेच शेजारील शेतांमधील विहिरींच्या पाणीपातळीला आधार देणारा असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. तलावात पाणी राहिल्यास विहिरींना पाणी मिळते, मात्र तलाव कोरडा पडल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते हानिप बागवान यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड यांनी तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तलावात टाकण्यात आलेल्या मोटारपंपांची नोंद घेण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांची नावेही नोंदवण्यात आली आहेत. यानंतर ही माहिती महसूल विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली.
दरम्यान, सिंचन विभागाने या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. लघु पाटबंधारे सिंचन विभागाच्या अभियंता विशाखा सावंग यांनी उपविभागीय अभियंता देविदास केंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थळ पाहणी करून अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन दिवसांत मोटारपंप काढून घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ठराविक मुदतीत मोटारी काढून न घेतल्यास महसूल विभाग, ग्रामपंचायत व महावितरण यांच्या संयुक्त कारवाईतून मोटारपंप जप्त करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकारामुळे गावात पाणी व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढली असून, प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

