जिजाऊ जयंतीनंतर स्वच्छतेचा आदर्श!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-प्रशासन–पत्रकारांच्या सहकार्याने राजवाडा परिसरात प्रभावी कचरा व्यवस्थापन

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा शहरात महाराष्ट्रभरातून लाखो जिजाऊभक्त दाखल झाले होते. उत्सवकाळात राजे लखुजीराव जाधव राजवाडा, मातृतीर्थ व जिजाऊ सृष्टी परिसरात मोठी वर्दळ होती. भाविकांच्या उपस्थितीमुळे निर्माण झालेला कचरा शिस्तबद्ध पद्धतीने हाताळत ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रशासन व पत्रकारांच्या सहकार्याने सोमवार (दि. १३ जानेवारी) रोजी सुनियोजित स्वच्छता व कचरा व्यवस्थापन मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमात उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे (सिंदखेडराजा), तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजित बांगर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे (सिंदखेडराजा) तसेच सतीश तुरुकमाने, पंचायत समितीचे अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे भूपमापक प्रकाश शिंदे यांनी पुढाकार घेत कामाचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. प्रशासनाने आवश्यक कर्मचारी, साधनसामग्री व कचरा संकलन यंत्रणा उपलब्ध करून दिल्यामुळे स्वच्छता मोहीम प्रभावीपणे पार पडली. यावेळी पत्रकार मुकुंद पाठक, नंदू वाघमारे, गजानन मेहेत्रे यांच्यासह पंचायत समिती, नगर परिषद, तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय सिंदखेडराजा येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी श्रमदान करत कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन व योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबविली.

प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, मोठ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर तातडीने कचरा व्यवस्थापन राबविणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, भविष्यात अशा उपक्रमांसाठी पूर्वनियोजन अधिक सक्षम करण्यात येईल. आयोजक संस्था, सेवाभावी संघटना व नागरिकांनीही स्वच्छतेबाबत सजग राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या संयुक्त उपक्रमामुळे राजवाडा परिसर पुन्हा स्वच्छ व सुव्यवस्थित झाला असून, प्रशासन व पत्रकार यांच्यातील सकारात्मक समन्वयामुळे स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता एक सामूहिक संस्कार असल्याचा संदेश समाजात गेला आहे. जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांना अनुसरून शिस्त, जबाबदारी व सार्वजनिक स्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली

Share This Article
Exit mobile version