बुलढाणा ‘झेडपी’ची निवडणूक लांबली!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

– चार वर्षांनंतर १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल!
– संभाजीनगर, सोलापूर, पुणेसह बारा जिल्ह्यांत आचारसंहिता लागू; ५ फेब्रुवारीला मतदान

बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असतानाच ग्रामीण राजकारणालाही मोठा वेग आला आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (१३ जानेवारी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र, बुलढाणा जिल्हा परिषदेसह राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने तेथील राजकीय वातावरणात नाराजी पसरली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार पुणेसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे आदेश देण्यात आले असून, उपजिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.

बुलढाण्यासह २० जिल्ह्यांना प्रतीक्षा कायम

राज्यात एकूण ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात फक्त १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषद आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका याराखीव सदस्य संख्येची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने वादात सापडल्या असून, त्या पुढील टप्प्यात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्हा परिषदेसह अनेक जिल्ह्यांतील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता कायम आहे.

प्रशासकराजाला अखेरचा ब्रेक?

पुणेसह काही जिल्हा परिषदांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आला होता. तेव्हापासून आजतागायत या संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. चार वर्षांहून अधिक काळ लोकप्रतिनिधींशिवाय कारभार सुरू असल्याने विकासकामे आणि निधी वितरणावर परिणाम झाल्याच्या तक्रारी होत होत्या. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने पुणे जिल्हा परिषदेला अध्यक्ष आणि पंचायत समित्यांना सभापती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा आज (१३ जानेवारी) शेवटचा दिवस असल्याने शहरी राजकारण शिगेला पोहोचले आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेमुळे ग्रामीण भागातही राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात गावोगावी राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
1. अधिसूचना प्रसिद्धी : १६ जानेवारी २०२६
2. उमेदवारी अर्ज दाखल : १६ ते २१ जानेवारी २०२६
3. अर्ज छाननी : २२ जानेवारी २०२६
4. उमेदवारी माघार : २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
5. अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३.३० नंतर)
6. मतदान : ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
7. मतमोजणी व निकाल : ७ फेब्रुवारी २०२६
—-
पहिल्या टप्प्यात निवडणूक होणारे जिल्हे
1. कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
2. पुणे विभाग : सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
3. मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर


चार वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, त्यातून ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे आणि राजकीय दिशा स्पष्ट होणार आहे.

Share This Article
Exit mobile version