–संस्कार, भक्ती आणि ज्ञानाचा संगम;
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील तुळापूर धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात “ओळख ज्ञानेश्वरीची” हा सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण शालेय मूल्यशिक्षण संवर्धनाचा, संस्कारक्षम उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. दर शनिवारी आनंददायी वातावरणात हरीपाठाचे वाचन, गायन तसेच ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे सविस्तर विवेचन असा भक्ती–ज्ञानमय कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात विद्यालयाचे मुख्याध्यापक आबा जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ हा उपक्रम सातत्याने आणि प्रभावीपणे राबविला जात असून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीची जाण, वाचनाची आवड आणि मूल्यशिक्षणाची जडणघडण अधिक बळकट होत आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना संतसाहित्याचे सातत्यपूर्ण अध्ययन व मनन याचे महत्त्व समजावून सांगितले.
विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या एकजुटीच्या सहकार्यामुळे हा उपक्रम दर शनिवारी नियमितपणे राबविला जात आहे. या माध्यमातून गावात शैक्षणिक तसेच आध्यात्मिक बैठक निर्माण होत असून, ज्ञानेश्वरीचे वाचन व मनन विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला नवी दिशा देत आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या संस्कारक्षम उपक्रमांची मालिका राबविण्याचा मानस विद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.

