खाजगी शिक्षण संस्थांच्या समस्यांवर उद्या मंथन; देऊळगाव मही येथे जिल्हास्तरीय ‘सहविचार सभा’

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-“अनुदान, भरती व धोरणांवर उद्या जिल्हास्तरीय सहविचार सभा”

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) — राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांसमोरील वाढत्या अडचणी, शासनाचे वेळोवेळी बदलणारे शैक्षणिक धोरण आणि विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षण संस्था महामंडळाच्यावतीने उद्या, रविवार (दि. ११) रोजी देऊळगाव मही येथे बुलढाणा जिल्हास्तरीय ‘सहविचार सभा’ आयोजित करण्यात आली आहे.

देऊळगाव मही येथील सांस्कृतिक सभागृहात सकाळी १०.३० वाजता सभेला प्रारंभ होणार असून अष्टविनायक शिक्षण प्रसारक मंडळ (निमगाव गुरु) आणि कै. भास्कररावजी शिंगणे विद्यालय (मंडपगाव) यांच्या पुढाकाराने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेकडो शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक व प्रतिनिधी या सभेत सहभागी होण्याची शक्यता आहे. या सहविचार सभेत खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानाशी संबंधित प्रश्न, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील निर्बंध, तसेच नव्या शैक्षणिक आराखड्याची अंमलबजावणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल व तांत्रिक चर्चा अपेक्षित आहे. केवळ मागण्या मांडण्यापुरते हे व्यासपीठ मर्यादित न ठेवता, भविष्यातील आंदोलन व संघर्षाची दिशा ठरवण्यासाठीही ही सभा महत्त्वाची ठरणार आहे.

सभेचे निमंत्रक तथा अष्टविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव शिवाजीराव चित्ते, मुख्याध्यापक प्रविण मिसाळ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व संस्था प्रतिनिधींनी या सहविचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version