जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावांसाठी सुमारे ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार मोनिकाताई राजळे यांच्या पाठपुराव्याला यश

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-जायकवाडी प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासाला गती

बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : जायकवाडी प्रकल्पामुळे (नाथसागर जलाशय) १९७० च्या दशकात शेवगाव तालुक्यातील अनेक गावे पूर्णतः अथवा अंशतः बाधित झाली होती. या प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून, या माध्यमातून रस्ते व अंतर्गत विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे.

आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मागणीनुसार पुनर्वसित मौजे सोनविहीर येथे सोनुबाई मंदिर ते पहिलवानबाबा मंदिर रस्ता (साखळी क्र. ०/०० ते २/६२५ किमी) मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मौजे कऱ्हेटाकळी अंतर्गत कऱ्हेटाकळी ते खानापूर लिफ्ट रस्ता (साखळी क्र. ०/०० ते १/९४० किमी) मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

मौजे लाखेफळ अंतर्गत लाखेफळ ते जुने दहिफळ रस्ता (साखळी क्र. १/०५० ते २/६०० किमी) मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी २१ लाख रुपये, तर मौजे खानापूर येथे गावाअंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी २९ लाख ८८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एकूण ४ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी या कामांसाठी प्राप्त झाला आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित कामांसाठी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

या निधीमुळे जायकवाडी प्रकल्पग्रस्त व पुनर्वसित गावांमधील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

Share This Article
Exit mobile version