अलंकापुरीत पत्रकार दिन उत्साहात; माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन पत्रकार संघाचा मुंबई दौरा मार्गस्थ

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

पत्रकार दिनानिमित्त धार्मिक-सामाजिक उपक्रमांचा संगम

आळंदी (अर्जुन मेदनकर) : हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने ‘पत्रकार दिना’चे औचित्य साधून तीर्थक्षेत्र अलंकापुरीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पत्रकार बांधवांनी माऊलींच्या चरणी नतमस्तक होत सत्यनिष्ठ पत्रकारितेसाठी आशीर्वाद मागितले. त्यानंतर सिद्धबेटावर वृक्ष संवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

सकाळी ठीक ७ वाजता मंगलमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या चल पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली. वेदमूर्ती प्रफुल्ल प्रसादे यांच्या पौरोहित्याखाली वेदघोषाच्या स्वरात हा धार्मिक विधी संपन्न झाला. यावेळी श्रींचे दर्शन घेऊन श्री गणेश मंदिर मंडपात आरती करण्यात आली. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर व जिल्हा प्रतिनिधी अमर गायकवाड यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. समाजहितासाठी आणि निडर, सत्यनिष्ठ पत्रकारितेच्या कार्यासाठी माऊलींच्या चरणी पत्रकारांनी सामूहिक प्रार्थना केली.

मंदिरातील कार्यक्रमानंतर सकाळी ८ वाजता सर्व पत्रकार बांधवांनी श्री संत लीलाभूमी सिद्धबेट येथे भेट दिली. येथे पवित्र अजानवृक्षाची पूजा करून निसर्ग संवर्धन व पर्यावरण संरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. पत्रकारिता करतानाच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी अर्जुन मेदनकर यांनी व्यक्त केले. गेल्या चार वर्षांपासून सिद्धबेट परिसरात वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य सुरू असून ही हरित संपदा जपणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधव व मान्यवरांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. अलंकापुरीतील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर पत्रकार संघाचा पुढील नियोजित मुंबई दौऱ्यासाठी प्रस्थान करण्यात आले. या उपक्रमामुळे पत्रकारितेसोबत अध्यात्म आणि पर्यावरण रक्षणाचा सुंदर संगम आळंदीत अनुभवायला मिळाला.

Share This Article
Exit mobile version