महामार्गावर मृत्यूचा थरार! शिवशाही बसच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच चिरडून मृत्यू!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– धाड गावाजवळ भीषण अपघात; वीस वर्षांखालील तिघांचे आयुष्य क्षणात संपले!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगर–बुलढाणा महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. धाड गावाजवळ करडी येथील पुलावर भरधाव शिवशाही बस आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन तीन निष्पाप तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की एका युवकाच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने मेंदू बाहेर पडल्याचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य घटनास्थळी पाहायला मिळाले.

मलकापूर आगाराची शिवशाही बस (क्रमांक MH 06 BW 3638) ही छत्रपती संभाजीनगरहून बुलढाणामार्गे मलकापूरकडे निघाली होती. सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली. दुचाकीवर तीन तरुण प्रवास करत होते. भरधाव दुचाकी थेट बसखाली घुसल्याने अपघाताची तीव्रता वाढली. या भीषण दुर्घटनेत बुलढाणा तालुक्यातील ढालसावंगी गावातील कैलास दांडगे, रवी चंदनशिव आणि अंकुश पाडळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे तिन्ही तरुण वीस वर्षांच्या आतील होते. आयुष्य सुरू होण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली!

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासन व रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. रस्त्यावर पडलेले मृतदेह पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत होती. महामार्गावरील अपघातांची मालिका थांबणार कधी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Share This Article
Exit mobile version