आळंदीत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज रथोत्सव हरिनाम गजरात संपन्न

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-भक्ती, उत्साह व परंपरेचा संगम; भाविकांनी रथ ओढत केली सेवा

आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वार्षिकोत्सवानिमित्त आळंदीत श्रींचा भव्य रथोत्सव “श्री विठ्ठल, श्री विठ्ठल” नामजयघोषात आणि हरिनाम गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. भाविकांनी श्रींचा रथ हाताने ओढत परंपरेनुसार सेवा बजावली. रथोत्सवाच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ येथून रथोत्सव नगरप्रदक्षिणेस सुरुवात झाली. प्रदक्षिणा मार्गावर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत श्रींचे दर्शन घेतले. पुण्यतिथी महोत्सव तसेच मुक्तद्वार अन्नसंतर्पण महाप्रसादालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रथोत्सव काळात संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आळंदी पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिसांनी प्रभावी बंदोबस्त ठेवत मिरवणुकीचे नियोजन काटेकोरपणे केले. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, भीमा घुंडरे, पोलीस मित्र योगेश जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच आळंदी ग्रामस्थांनीही रथोत्सवात सेवा बजावली.

नगरप्रदक्षिणा मार्गावर मानकरी श्री रानवडे परिवाराने परंपरेनुसार नगारखाना सेवा देत रथोत्सवात योगदान दिले. श्रींचे पुजारी सुधीर गांधी, सुरेश गांधी, गजानन गांधी व गांधी परिवार, अवधूत महाराज चक्रांकित परिवार यांनी स्वामी महाराज मूळपीठ येथे रथोत्सवाचे पारंपरिक स्वागत केले. आळंदी देवस्थानतर्फे रथोत्सवाचे स्वागत करण्यात आले. आवेकर भावे रामचंद्र संस्थानतर्फे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी संस्थानच्या वतीने श्रींची पूजा व स्वागत केले. रथोत्सव हजेरी मारुती मंदिर, मरकळ चौक, पाण्याच्या टाकीमार्गे, कॉसमॉस बँक, आळंदी पोलीस स्टेशन, नगरपरिषद चौक, महाद्वार मार्गे स्वामी महाराज मठ येथे पोहोचला.

माऊली मंदिरालगत स्वामींच्या मूळपीठावर श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाद्वार चौकातून माऊली मंदिरासमोरून भराव रस्ता, चाकण चौक मार्गे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा वैभवी रथोत्सव मठात दाखल झाला. रथोत्सव मार्गावर भाविकांनी रांगोळ्या, पुष्पहार, आरती व प्रसाद देत स्वागत केले. माऊली मंदिरासमोर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने श्रींची पूजा, आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थान व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, चोपदार सेवक, मानकरी व देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल नामघोषात ग्रामस्थांसह भाविकांनी श्रींचा रथ ओढत रथोत्सवात सहभाग नोंदवला. फटाक्यांची आतिषबाजी ही भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. रथोत्सवात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान मठाचे पदाधिकारी, पुजारी, माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी व गांधी परिवार, सेवक, वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरेनुसार ग्रामस्थ पै. सचिन रानवडे परिवाराने नगारखाना सेवा दिली. श्रींचे पुजारी आळंदीचे माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी व त्यांच्या कुटुंबीयांकडून श्रीपूजा, धार्मिक विधी व पोशाख सेवा नित्यनेमाने परंपरेने पार पाडली जाते.

Share This Article
Exit mobile version