– ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे प्रतिपादन
दुसरबीड (भगवान नागरे) : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लाखो वारकरी नतमस्तक होतात. ज्ञानेश्वर–तुकारामांच्या विचारांची परंपरा आजही समाजाला दिशा देणारी आहे. त्याच परंपरेतील राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत संतविचारांचे आचरण केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दुसरबीड येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात संत भगवान बाबांना अभिप्रेत असलेला विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचे आवाहन ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी केले.
ते म्हणाले, “संत भगवान बाबांनी जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन संपूर्ण मानव समाजासाठी कार्य केले. त्यांच्या कीर्तनातून शैक्षणिक परिवर्तन, सामाजिक प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश समाजात रुजवला. आज आपण खरोखरच संतांच्या विचारांच्या मार्गावर चालतो आहोत का, याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.” कीर्तनादरम्यान ह.भ.प. चेपटे महाराज यांनीही भावपूर्ण विचार मांडले. “विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल कुळीचे दैवत” या अभंगातून त्यांनी संतांचे महत्त्व विशद केले. संत म्हणजे जात-धर्म-दोष संपवून उरणारे व्यक्तिमत्त्व असून, ज्याच्या मनात भेदभाव नाही तोच खरा महाराज असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आज माणूस गाव पेटेल अशी भाषा करतो, पण देव भेटेल असे कुणी बोलत नाही. कल्पनेचा देव न करता देवाची कल्पना करा. जे आपल्याला वास्तवात आणतात तेच संत असतात. नामस्मरणाचा ध्यास लागला, तरच जीवन सुखी होईल.” यावेळी सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. डी. एस. शिंदे यांच्या रुग्णसेवेचा तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गीते यांच्या सामाजिक एकतेसाठीच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. अशा व्यक्ती समाजासाठी देवमाणूस असल्याचे प्रतिपादन महाराजांनी केले. या कीर्तन सोहळ्यास ह.भ.प. सतीष महाराज डोईफोडे, प्रवीण गीते, डॉ. डी. एस. शिंदे यांच्यासह असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

