वेतन देयकावर स्वाक्षरी करा, अन्यथा आंदोलन!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-शिक्षक–शिक्षकेतर संघटनांचा इशारा

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतरांच्या एकत्रित वेतन देयकावर स्वाक्षरी न करण्याचे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शिक्षकांचे रखडलेले वेतन तात्काळ द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

शालांत घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतरांच्या एकत्रित वेतन देयकावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील लाखो शिक्षकांचे वेतन रखडले आहे. वास्तविक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या आंदोलनातील मागण्यांबाबत शिक्षक व शिक्षकेतर संघटनांना सहानुभूती असून, संघटना अधिकाऱ्यांसोबत नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असतात. तथापि, आपल्या मागण्या व समस्यांसाठी अधिकारी वर्गाने सरकारसोबत असहकार आंदोलन करण्याऐवजी शिक्षक व शिक्षकेतर यांच्या वेतन देयकावर स्वाक्षरी न करून त्यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे शिक्षक वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

यामुळे आपले नियमित वेतन तात्काळ द्यावे, या मागणीसाठी शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर यांचे वेतन तात्काळ द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी वि. मा. शि. संघाचे विभागीय कार्यवाह प्रा. बाळासाहेब गोटे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, मुंबईचे उपाध्यक्ष विनायक उज्जैनकर, वि. मा. शि. जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, कार्यवाह कुलदीप बदर, कार्याध्यक्ष प्रा. विजय भड, विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष कुटे, सचिव प्रा. शंकर लहाने, भाजप शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. मंगेश धानोरकर, प्रणव बोलवार, शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष कैलास ढवळे, सचिव रामराव कायंदे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव अविनाश पसारकर, विना अनुदानित उच्च माध्यमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत कवर, सचिव दिगंबर गुडदे, वि. मा. शि. उपाध्यक्ष बबनराव ठाकरे, प्रा. रघुनाथ चौधरी, विज्युक्टाचे प्रा. गजानन जनकवाडे, सुभाष फुलउंबरकर यांच्यासह सर्व संघटनांचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version