-पोलीस-महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तरुणांनी दूध पिऊन केले नववर्षाचे स्वागत
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : नवीन वर्षाचे स्वागत दारूच्या नशेत न करता सामाजिक भान जपत, व्यसनमुक्त व सशक्त समाज उभारण्याचा संकल्प घेऊन मलकापूर पांग्रा येथे गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने ‘शराब नही, दूध पियेंगे’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. याच गौरवशाली परंपरेनुसार मंगळवार, दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पोलीस मदत केंद्रासमोर शेकडो तरुणांनी दूध प्राशन करून नवीन वर्षाचे स्वागत आदर्श पद्धतीने केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अजित बांगर होते. ठाणेदार गजानन करेवाड, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, गटशिक्षणाधिकारी निकम यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तरुणांनी दूध प्राशन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुलशेर खासाब शेख, अकील ठेकेदार, सरपंचपती यादव टाले, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष मोहम्मद यारखा, डॉ. दिनकर सोनुने, प्रवीण देशमुख, लोकजागरचे प्रवीण गीते, वसंतराव उदावंत, डॉ. सुरेश डोडिया, तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक, शंकर उगलमुगले, अविनाश नागरे, बीट जमादार निवृत्ती पोफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन वर्ष साजरे करताना दारू, व्यसन, अपघात व आरोग्याच्या समस्या वाढू नयेत, या उद्देशाने २५ वर्षांपूर्वी ‘शराब नही, दूध पियेंगे’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या काळात दारू पिऊन नववर्ष साजरे करण्याची रूढी होती. मात्र, “मरीज नाही, सशक्त बनूया” हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी तरुणांनी दूध वाटप करून नववर्ष साजरे करण्याचा आदर्श पायंडा घातला. कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भगवान साळवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हानिप बागवान, पत्रकार वसीम शेख, ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे, अमोल साळवे, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मगर, ज्ञानेश्वर कळकुंबे यांनी केले.
बॉक्स :
व्यसनमुक्तीसाठी एक लाखांचा पुरस्कार — सत्तार बाबा यांची घोषणा
व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी येत्या काळात एक लाख रुपयांचा पुरस्कार देणार असल्याची घोषणा नुकतीच उमराहून पवित्र यात्रा करून आलेले सत्तार बाबा यांनी केली.
गाव व्यसनमुक्त करा, वाचनालय सुरू करणार
गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी महापुरुष व संतांचे विचार आत्मसात करा, शिक्षण घ्या आणि व्यसनमुक्त राहा, असा सल्ला देत ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करणार असल्याची माहिती दिली.
नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येक गावात असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. ठाणेदार गजानन करेवाड यांनी, “३१ डिसेंबरला दारू पिऊन भरधाव वाहन चालविल्यामुळे अपघात व हिट-अँड-रनच्या घटना वाढतात; त्यामुळे दारू नव्हे, दूध प्या आणि सशक्त बना,” असे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी निकम यांनी युवकांना “वाचनाची नशा करा” असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन आटोळे यांनी केले, सूत्रसंचालन पत्रकार भगवान साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक यांनी मानले. पोलीस, महसूल, शिक्षण व सामान्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

