-३ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान भक्तीमय वातावरणात भव्य धार्मिक आयोजन
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे महान संत व वारकरी संप्रदायाचे दीपस्तंभ श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याचे शनिवार दि. ३ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे. आठ दिवस चालणारा हा महासोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे.
अखंड नामस्मरण व धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकडा, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन, भक्ती संगीत भजन, हरिजागर तसेच नवनाथ भक्तीसार ग्रंथ पारायण व ५१ कुंडात्मक हरिहर महायाग असे भव्य अनुष्ठान सातही दिवस अखंड सुरू राहणार आहे.
मुख्य मंदिरात दररोज सकाळी ६ वाजता महारुद्राभिषेक तसेच नित्य होम-हवनकार्य होणार असून, विविध व्यासपीठांवर मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकार आपले विचार मांडणार आहेत.
नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांची उपस्थिती
या सुवर्ण महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार सहभागी होणार आहेत.
प्रवचन सेवा :
ह.भ.प. राम महाराज शास्त्री (आळंदी),
ह.भ.प. रोहिदास महाराज गर्जे (राजेयर्माभीगड, हातोला),
महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज (तारकेश्वरगड),
ह.भ.प. नारायण महाराज डिसले (दगडवाडी),
महंत ह.भ.प. जनार्दन महाराज (मच्छिंद्रनाथगड, मायंबा),
महंत ह.भ.प. काशिनाथ महाराज (गणेशगड, नागतळा),
ह.भ.प. परमेश्वर महाराज जायभाय (आळंदी),
ह.भ.प. भगवान महाराज मचे (हरेश्वर संस्थान, चिचोंडी),
ह.भ.प. मुरलीधर महाराज बारगजे (पिंपळनेर),
ह.भ.प. आदिनाथ महाराज लाड (आळंदी),
महंत ह.भ.प. महादेवानंद भारती (अश्वलिंग संस्थान, पिंपळवंडी),
१००८ स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वती (इंव्यासीनी संस्थान),
ह.भ.प. राणु महाराज रासकर (पंढरपूर),
ह.भ.प. आसाराम महाराज बड़े (आळंदी) यांचे प्रवचन होणार आहे.
रात्री कीर्तन सेवा :
ह.भ.प. प्रल्हाद महाराज शास्त्री (दैठणकर),
विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर (बुलढाणा),
ह.भ.प. मुकुंदकाका जाटवेवळेकर (पाथर्डी),
ह.भ.प. प्रभाकर महाराज बोधले (पंढरपूर),
ह.भ.प. जलाल महाराज सय्यद (निफाड),
महामंडलेश्वर अमृत महाराज जोशी (बीड),
ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे (आळंदी).
भक्ती संगीताची रंगत
भक्ती संगीत भजनासाठी अमोल मोरे, महेश खोपटीकर, वैभव कडू (नवी मुंबई), नंदिनी गायकवाड (टी.व्ही. स्टार, पुणे), पंडित कृष्णा बोंगाणे, राधाकृष्ण गरड, सुनील पासलकर (रेडिओ स्टार) यांसारख्या नामवंत कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे.
पुण्यतिथी दिनाचा विशेष सोहळा
शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज यांचे सकाळी काल्याचे कीर्तन होणार आहे. पुण्यतिथीच्या पुण्यकाळी सकाळी ११.४५ वाजता पुष्पवृष्टी होऊन त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
या सुवर्ण महोत्सवी पर्वकाळात श्री संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा तसेच सोन्याच्या कळसासाठी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या श्री क्षेत्र गहिनीनाथगड, चिंचोली (नाथ), आठेगाव पुठ्ठा व परिसर, ता. पाटोदा, जि. बीड येथे जय्यत तयारी सुरू आहे.

