कर्जाचा फास आवळला!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-अतिवृष्टीत पिके गेली; मलकापूर पांगऱ्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, त्यातच बँक व खासगी कर्जाचा वाढता डोंगर… या दुहेरी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने मलकापूर पांगरा (ता. सिंदखेडराजा) येथील एका ज्येष्ठ शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे सहा वाजता बाबुराव देशमुख हे शेतातील मोटार सुरू करण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी शोध घेतला असता, शेतातील उंबराच्या झाडाला पिवळ्या नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना समजताच गावात एकच खळबळ उडाली. बाबुराव देशमुख यांच्यावर बँकेचे तसेच नातेवाइकांचे कर्ज होते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पीक पूर्णतः हातचे गेले होते. उत्पन्नाचा स्रोत बंद, कर्जफेडीचा तगादा आणि वाढता मानसिक तणाव यामुळे ते काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

या प्रकरणी अमोल संजयराव देशमुख यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ३७/२०२५, कलम १९४ BNSS अंतर्गत नोंद दिली आहे. मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार निवृत्ती पोफेळ करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि अपुरी शासकीय मदत यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल होत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र नेमके कधी थांबणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Share This Article
Exit mobile version