परमहंस श्री तेजस्वी महाराजांच्या षोडसी सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-वरोडी तीर्थक्षेत्रात भक्तिभावाचा संगम; धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या षोडसी सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले.

परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दि. १३ डिसेंबर रोजी वैकुंठगमन झाले होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात मंत्रोच्चारात त्यांचा समाधी सोहळा पार पडला होता. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

दि. १५ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत गजानन गाथा पारायण, विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण, किर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. षोडसी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी आज दि. २८ डिसेंबर रोजी पहाटे काकडा आरती, त्यानंतर श्री चैतन्यपुरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महापंगतीत बसून हजारो भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

Share This Article
Exit mobile version