-हरिनाम गजर, वेदमंत्रांच्या जयघोषात सात दिवसीय धार्मिक सोहळ्याला सुरुवात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुदेवांचा वार्षिकोत्सव सोहळा रविवार (दि. २८) पासून हरिनाम गजर, धार्मिक प्रथा-परंपरा व वेदमंत्रांच्या जयघोषात भक्तिभावाने सुरू झाला आहे. यंदाच्या वार्षिकोत्सवाची सुरुवात परंपरेनुसार कोठी पूजनाने करण्यात आली.
वार्षिकोत्सवानिमित्त पहाटे श्रींना अभिषेक व दुधारती करण्यात आली. अवधूत चक्रांकीत यांचे विणा-पहारा भजन सुरू असून सात दिवस अखंड पहारा चालणार आहे. शेखर यांचे नगारा वादन, मावडीकर दिनेश यांचे सनयी वादन झाल्यानंतर कोठी पूजन विधी पार पडला. या प्रसंगी विश्वस्त बाबासाहेब देशमुख, दिडोळकर, हवेले, पुजारी मुकुंद काका, सुधीर काका, विलास काका, कौस्तुभ, मनीष, योगेश, प्रशांत, कैवल्य गांधी परिवार, फडके गुरुजी, प्रथमेश गुरुजी, राम फडके, पाठशाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ व भाविक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथा-परंपरांचे पालन करीत योगेश गांधी हे श्रींच्या शेजघरात गुरुचरित्र पारायणास बसले आहेत. श्रींना लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी बारा वाजता महानैवेद्य अर्पण करण्यात आला. दररोज दुपारी तीन वाजता गांधी पुजारी यांच्या निवासस्थानातून दशमी व भाजीचा नैवेद्य श्रींना दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी ह.भ.प. वासुदेव बुरसे यांची कीर्तनसेवा, धूपारती, सनयी वादन, वेदसेवा तसेच गावकरी मंडळींची भजनसेवा होणार आहे. वार्षिकोत्सवानिमित्त भाविकांना खिरापत वाटपही करण्यात येत आहे.

