– बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या अपेक्षित वर्चस्वाला नगरपरिषद निवडणुकांत मोठा धक्का!
– काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने दाखवली ताकद; मेहकर व शेगावमध्ये मोठे उलटफेर!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – तीन आमदार आणि एक कॅबिनेट मंत्री असलेल्या भाजपच्या अपेक्षित ‘साफ स्वीप’ला बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांत मोठा झटका बसला आहे. जनतेच्या कौलामुळे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आपली ताकद ठामपणे सिद्ध केली आहे. या निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. चिखली येथे आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी प्रभावी कामगिरी करत, नगरपरिषद भाजपकडे राखण्यात यश मिळवले. मात्र मेहकर आणि शेगावमध्ये झालेल्या उलटफेरांमुळे सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नांदुरा, खामगाव, जळगाव जामोद व चिखली या चारच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रभावाखाली असलेल्या मेहकर नगरपरिषदेत शिवसेना (ठाकरे गट)चे किशोर गारोळे हे नगराध्यक्षपदी निवडून आले. स्थानिक मतदारांनी बदलाची हवा दाखवत सत्ताधारी पक्षाला स्पष्ट संदेश दिला असून, याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद निवडणुकांतही उमटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शेगाव येथे काँग्रेसने प्रकाश शेगोकार यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद अध्यक्षपदावर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचे आमदार संजय कुटे यांचा स्थानिक प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. हा निकाल शेगावमध्ये काँग्रेसच्या वाढत्या दबदब्याचे द्योतक मानला जात आहे. लोणार येथे काँग्रेसच्या मीरा भूषण मापारी यांनी नगरपरिषद ताब्यात घेतली.
मलकापूर येथे काँग्रेसचे आतिक जवारीवाले यांनी नगरपरिषद अध्यक्षपदावर निर्णायक विजय मिळवला. बुलढाणा शहरात पूजाताई गायकवाड (शिवसेना – शिंदे गट) यांच्या निवडीमुळे सत्ताधारी भाजपला जिल्हा मुख्यालयात आपला प्रभाव टिकवताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक ठरला आहे.
सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे २१ वर्षीय सौरभ तायडे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवून महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. येथे आमदार मनोज कायंदे यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. मात्र माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या प्रभावाची छाप कायम ठेवली आहे. देऊळगावराजा येथे माधुरीताई शिपणे यांनी नगरपरिषद अध्यक्षपदावर विजय मिळवत राष्ट्रवादी गटाचा प्रभाव अधिक मजबूत केला. त्या अजित पवार गटातील आमदार मनोज कायंदे यांच्या गटाच्या आहेत. या ठिकाणी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या आघाडीला त्यांनी चांगलीच धूळ चारली.
भाजपच्या अपेक्षित वर्चस्वाला मोठा धक्का!
बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपच्या अपेक्षित वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. मेहकर व शेगावमधील उलटफेरांमुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे आकाराला येत असून, युवाशक्तीचा प्रभाव वाढत चालल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मेहकरात भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले तर लोणारातही पराभव झाला असून, येथे शिवसेना शिंदे गट व भाजपच्या उमेदवाराला जवळपास सारखीच मते पडली. याशिवाय, मलकापूर, शेगाव येथेही भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

