– डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्टच्यावतीने पुरस्कार सोहळा; आरोग्य शिबिराचेही आयोजन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – महाराष्ट्रातील समाजसेवा आणि धार्मिक कार्यासाठी प्रसिद्ध श्री पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधीपती वेदान्ताचार्य शिवाचार्यरत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा सन्मान डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्टच्यावतीने काल, दि. २६ डिसेंबर रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याहस्ते सन्मानित झालेल्या सिध्दलिंग शिवाचार्य महाराजांनी वयाच्या १० व्या वर्षी मठात पदार्पण केले. १९७२ पासून मठाधीपती म्हणून कार्यरत असलेल्या महाराजांनी वीरशैव धर्माचा प्रचार, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, सर्वधर्मसमभाव महाशिबीरे यांसह हजारो विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण दिले.
या सन्मान सोहळ्यात राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड. नाझेर काझी, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झवर, डॉ. अमजदखान पठाण, अयाज खान पठाण उपस्थित होते. याच वेळी कर्करोग महाशिबीराचे आयोजनही करण्यात आले होते. महाराजांचा हा पुरस्कार मठाधीपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी स्वीकारला. हा सन्मान त्यांच्या धर्मसेवा, समाजकार्य आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचे प्रतीक ठरला.

