–१२ जानेवारी २०२६ च्या भव्य आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सवाच्या तयारीसाठी केंद्रीय आयोजन समितीची बैठक
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सालाबादप्रमाणे १२ जानेवारी २०२६ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे होणाऱ्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या भव्य-दिव्य आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीसाठी मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टी येथे पार पडली. या बैठकीस मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजयकुमार घोगरे यांनी, “जिजाऊ जन्मोत्सव हा केवळ कार्यक्रम न राहता तो लोकांचा, समाजाचा लोकोत्सव झाला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने मनापासून परिश्रम घ्यावेत,” असे आवाहन केले. या बैठकीस जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव तनपुरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, सहसचिव सौरभ खेडेकर, प्रकल्प संचालक अरविंद गावंडे, जिल्हाध्यक्ष रविंद्र चेके, मुख्य समन्वयक डॉ. मनोहर तुपकर, डॉ. कळकुंबे पाटील, विलासराव तेजनकर, तुपकर मामा, रामेश्वर ढगे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिजाऊ माँसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ स्तवन झाले व मुख्य बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीत जिजाऊ जन्मोत्सवाच्या आयोजनाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन, नगरपालिका व एस.टी. महामंडळ यांच्याशी समन्वय साधून जिजाऊ जन्मस्थळ ते जिजाऊ सृष्टी दरम्यान अल्प दरात बस सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू ठेवण्याबाबत एकमत झाले. त्यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व भाविकांना कार्यक्रमांचा लाभ घेता येईल.
तसेच पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, जालना रोडवरील वाहन व्यवस्थापन, शाळांच्या बस उपलब्धतेबाबतही चर्चा झाली. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. बैठकीत खर्च, जमा होणारा निधी व त्यातील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला. प्रचार-प्रसारासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून जिजाऊ जन्मोत्सवाची माहिती महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर विविध समित्यांची जबाबदारी पदाधिकाऱ्यांना सोपविण्यात आली. पुस्तक स्टॉल, शाहीर-पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक विवाह, साहित्यप्रकार, प्रमुख पाहुणे निमंत्रण, निवास व्यवस्था, दीपोत्सव मशाल, वारकरी दिंडी, सुरक्षा, विचार मंच, सजावट, प्रचार-प्रसार व समाजमाध्यम समित्या गठीत करण्यात आल्या. बैठकीच्या शेवटी उपस्थित संयोजन समिती सदस्यांनी महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन करत जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव भव्य, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

