-षोडशी सोहळ्याने वरोडी येथे भाविकांचा भक्तिसागर
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : तीर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे दि. १३ डिसेंबर रोजी वैकुंठगमन झाले. त्यानिमित्त १३ ते २८ डिसेंबर या कालावधीत एकूण १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत दररोज हजारो भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घेतला.
वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वैकुंठगमन झाले. त्यापूर्वी दि. २८ नोव्हेंबर रोजी त्यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला होता. त्या वेळी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच महाराजांनी अन्न व पाणी घेण्यास नकार दिला. दोन्ही मूत्रपिंड कार्यरत नसल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली.
महाराजांवर त्यांचे नातू डॉ. गुंजकर उपचार करीत होते. काही वेळा महाराज उठून बसत आणि रामकृष्ण हरी नामस्मरणाच्या भजनात तल्लीन होत. हे दृश्य पाहून भाविकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत होते. हा भावनिक क्षण माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री सुबोध सावजी, आमदार मनोज कायंदे व आमदार सिद्धार्थ खरात यांनीही अनुभवला. दि. १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता महाराजांचे वैकुंठगमन झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे भाविकांमध्ये शोककळा पसरली. लाखो भाविकांचे डोळे पाणावले. दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली. दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महाराजांचा देह दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतरही हजारो भाविक रांगेत उभे होते. वेळेअभावी अनेक भाविकांना हात जोडून दूरूनच दर्शन घ्यावे लागले.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीत वेदांताचार्य सिद्धचैतन्य महाराज, हरिचैतन्य स्वामी महाराज यांच्यासह १२ अनुयायांच्या मंत्रोच्चारात महाराजांचा समाधी सोहळा पार पडला. दि. १५ डिसेंबरपासून दररोज कीर्तन, गजानन महाराज पारायण, विष्णुसहस्रनाम स्तोत्र यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले. षोडशी सोहळ्यानिमित्त दि. २८ डिसेंबर रोजी हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण गारोळे यांनी दिली.

